राज्यातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी १५ पाककृती करण्यात आल्या निश्चित

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या १५ पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात तीन संरचित आहार पद्धतीनुसार व्हेजिटेबल पुलाव, नाचणी सत्व, अंडा पुलाव, तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्याच त्या खिचडीला स्वादिष्ट पर्याय उपलब्ध झाला आहे.

शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. तसेच योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो. सद्यस्थितीत तांदूळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहार दिला जात आहे. केंद्र शासनाने दिलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी वृध्दिंगत करणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी पाककृती सुधारणा समिती नियुक्त करण्यात आली होती. राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये निर्माण केल्या जात असलेल्या परसबागांतून उत्पादित भाजीपाला, फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार मिळण्यास मदत होत आहे.

या पार्श्वभूमीवर आहारात वैविध्यता आणून तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर, नाचणी सत्व यांचा समावेश असलेला तीन संरचित आहार (थ्री कोर्स मील) देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मसाले भात, मोड आलेल्या मटकीची उसळ, मटार पुलाव, गोड खिचडी मुगडाळ खिचडी चवळी खिचडी, मुग शेवगा वरण भात, तांदळाची खीर, चणा पुलाव, नाचणीचे सत्व, सोयाबीन पुलाव, मोड आलेले कडधान्य या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत.

Protected Content