विज्ञानासोबत डोळस श्रद्धाही आपल्यासाठी उर्जादायी ठरते- डॉ. सुनील विभुते

भुसावळ प्रतिनिधी । विज्ञानयुगात अंधश्रद्धेला थारा नाही. परंतु आपण पण आस्तिक असलो तर डोळस श्रद्धा ही आपल्या कामासाठी ऊर्जादायी ठरत असते. त्यामुळे विज्ञानासोबत जगत असताना डोळस श्रद्धाही तितकीच महत्वाची असल्याचे दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील निर्णय या पाठाचे लेखक डॉ. सुनील विभुते यांनी झूम ॲपद्वारे आयोजित ऑनलाईन संवाद सत्रात सांगितले.

जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 8 रोजी मराठी विषय शिक्षकांसाठी ऑनलाईन संवाद सत्रास सुरूवात झाली. दहावी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्याशी संवाद साधण्याच्या अनोख्या उपक्रमातील पहिलाच संवाद डॉ. विभुते यांच्याशी साधण्यात आला. बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक तर डॉ. विभुते यांचा परिचय वंदना भिरूड यांनी करून दिला. डॉ. विभूते म्हणाले की, निर्णय पाठात रोबो या यंत्राविषयी माहिती दिली असून त्याला भावना नसल्याने तो दुसर्‍याचे दुःख, संकट समजून घेऊ शकत नाही. मानव हा संवेदनशील व भावनिक असल्याने दुसर्‍याच्या भावना समजून घेऊ शकतो. त्यामुळे शेवटी यंत्र हे यंत्र आहे, ते माणसाची जागा घेऊ शकत नाही, अशा प्रकारचा संदेश या पाठातून दिला असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. विभुते यांनी उत्तरे दिली. झूम ॲपद्वारे झालेल्या ऑनलाईन संवाद सत्रात संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी डॉ. जगदीश पाटील भुसावळ, वंदना भिरूड भुसावळ, दिलीप वैद्य रावेर, निर्मल चतुर यावल, संजय ठाकूर मुक्ताईनगर, व्ही.एन. पाटील जामनेर, दीपक चौधरी बोदवड, किशोर चौधरी मुक्ताईनगर यांनी परिश्रम घेतले.

Protected Content