प्रेयसीशी ब्रेकअपचा राग आल्यामुळे तरूणी नौकरी करत असलेल्या दुकानाला प्रियकराने पेटवले

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रेयसीशी ब्रेकअप झाल्याच्या रागातून एका प्रियकराने ती काम करत असलेले दुकानच पेटवून दिल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रेयसीशी ब्रेकअप झाल्यानंतर राग अनावर झाल्याने तिला धडा शिकविण्यासाठी आणि तिची नोकरी घालवण्यासाठी या तरुणाने हे पाऊल उचलले आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या बोहरा मशीद गल्ली परिसरात रितेश मकीजा यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. रितेश ३० एप्रिलच्या रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर १ मे रोजी सकाळीच्या सुमारास दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीने रितेश यांना फोन करून दुकानातून धूर निघत असल्याची माहिती दिली. त्यानंतर रितेश यांनी तात्काळ दुकान गाठले आणि या बाबतची माहितीही अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने दुकानाकडे धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत या आगीत सात लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते.
अचानक लागलेल्या या आगीची सत्यता जाणून घेण्यासाठी तहसील पोलिसांनी पुढील शोध सुरू केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. या तपासा दरम्यान, यामध्ये पहाटे चार वाजता अंगावर शाल पांघरलेला एक तरुण दुकानाच्या शटरखाली आग लावताना दिसला. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी रितेश, दुकानातील कर्मचारी आणि परिसरातील लोकांची चौकशी केली. रितेशच्या दुकानात एक मुलगी आणि इतर दोन लोक काम करायचे. मुलगी घटनेच्या दोन दिवसांपूर्वी कामावर गेली नव्हती. त्यावेळी दुकानात एक तरुण आला होता आणि त्याने तिच्या न येण्याबाबत रितेश यांना विचारपूस केली होती. त्यावेळी त्याने रितेश यांना मुलीचा मोबाइल नंबर देत फोन करायला सांगितले. कामात व्यस्त असल्याने रितेश यांनी या तरुणाला हवा तितका प्रतिसाद दिला नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास त्या दिशेने वळवला आणि तरुणीची चौकशी सुरू केली. तिने तो तरुण प्रशांत असल्याचे सांगितले. तिची प्रशांतसोबत मैत्री होती. मात्र प्रशांत तिच्यावर संशय घेत असल्याने तिने त्याच्याशी संपर्क तोडला असल्याचे तीने पोलिसांना सांगितले. यातूनच संतप्त झालेल्या प्रशांतने तिला धडा शिकविण्यासाठी हे पाऊल उचलले. दुकानाला आग लागली तर तिची नोकरी जाईल या विचारातून त्याने ही आग लावली असल्याचे चौकशी अंती समोर आले. या प्रकरणी प्रशांत रमेश चट्टे (वय 19, रा.जुनी कामठी) याला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहे.

Protected Content