जळगाव प्रतिनिधी । बांभोरी येथे मयत झालेल्या नातेवाइकांकडे येत असताना भरधाव वेगाने येणार्या अज्ञात चारचाकी वाहनाने काका व पुतण्या यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी जैन पाईप कंपनी समोर घडली.
याबाबत माहिती अशी की, महेश पोपट तायडे (वय-३२) व त्याचा पुतण्या जयवंत उर्फ कृष्णा रातीलाल तायडे (वय १४) दोन्ही रा. खडके रवंजा ता. एरंडोल हे दोघे बांभोरी येथे महेश यांच्या बहीणीचे सासरे वारल्याने त्यांच्याकडे दुचाकीवरून जात असताना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास समोरून येणार्या अज्ञात चारचाकी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले. दोघांचे मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले आहे.
मयत महेश तायडे जळगाव शहरातील गांधी मार्केट मधील नरेंद्र गमवाल यांच्याकडे काम आला होता गेल्या पंधरा वर्षांपासून रवंजा ते जळगाव नेहमी बसने प्रवास करत होते. त्यांना दुचाकी देखील व्यवस्थित चालवता येत नव्हती नेमकं आज त्यांच्या नातेवाईककडील व्यक्ती मयत झाल्याने त्यांच्याकडे जात असतांना दुचाकीवरून पुतण्या जयवंत यांच्यासोबत जात होते. मात्र समोरून भरधाव येणार्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने या दोघांवर काळाने घाला घातला आहे.
मयत महेश तायडे यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे या घटनेबाबत पारधी आऊट पोस्ट येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावेळी सिव्हील हॉस्पीटलमध्ये खडकी रवंजा या गावातील नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता.