अमळनेरात अत्याधुनिक जलतरण तलावाला मंजुरी

अमळनेर प्रतिनिधी । आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पुढाकाराने शहरात अद्ययावत जलतरण तलावाला मंजुरी मिळाली असून याला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

आमदार अनिल पाटील यांनी प्रयत्न केल्यामुळे जलतरण तलावास प्रशासकीय मान्यता मिळाली असून तब्बल २ कोटी ५६ लक्ष निधीतून हा अत्याधुनिक पद्धतीचा जलतरण तलाव तयार करण्यात येणार आहे.

अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातूनच शहर हद्दीत हा जलतरण तलाव साकारला जाणार आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेंतर्गत अमळनेर पालिकेस ही मंजुरी मिळाली असून या बाबतचा शासन आदेश दि.२७ मे २०२१ रोजी संबधित विभागाचे उपसचिव स्वा.म.नानल यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आणि क्रीडा मंत्री ना.सुनिल केदार,राज्यमंत्री ना.आदीती तटकरे यांच्या सहकार्याने ही मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली. तसेच ही प्रशासकीय मान्यता असून आता निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तात्काळ पाठपुरावा करून लवकरच निधीची उपलब्धता करत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे संकेत आमदारांनी दिले आहे.

या प्रकल्पासाठी आमदार अनिल पाटील यांना नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील व नगरसेवक यांचेही सहकार्य लाभत असल्याचे आमदारांनी सांगितले. जलतरण तलाव नेमका कुठे सकारावा यासाठी नगराध्यक्षा आणि पालिका पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे.

Protected Content