
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून गावचे सुपुत्र सुधाकर लोटन चौधरी यांची गुजरातमधील सुरत महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे. कळमसरे येथून व्यवसायाच्या निमित्ताने सुरत येथे स्थायिक झालेल्या सुधाकर चौधरी यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांच्या या निवडीने खान्देशसह सुरतमधील मराठी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुधाकर चौधरी हे गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून सुरत महानगरपालिकेत सातत्याने बहुमताने निवडून येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करत त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. सलग तीन वेळा जनतेने दिलेला कौल त्यांच्या कामाची पोचपावती मानली जात आहे. सुरतमध्ये स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपल्या मूळ गावाशी असलेली नाळ कायम ठेवली असून सामाजिक सलोखा आणि लोकसंपर्क यामुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली आहे.
राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही सुधाकर चौधरी यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांचे ते खंदे समर्थक मानले जातात. सुरत शहरात माळी समाजाचे गेल्या दोन दशकांपासून नेतृत्व करत त्यांनी समाजातील विविध उपक्रमांना गती दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा वर्षांपासून सर्व समाजासाठी स्वखर्चाने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करत त्यांनी सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण केला आहे. समाजकारण आणि जनसेवेच्या या कामामुळेच भाजपकडून त्यांना उपमहापौरपदाची मोठी जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सुधाकर चौधरी यांच्या निवडीची बातमी कळताच कळमसरे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावातील ग्रामस्थ, माळी समाज बांधव आणि तरुणांनी एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष साजरा केला. खान्देशातील एका छोट्याशा गावातील व्यक्तीने सुरतसारख्या मोठ्या शहरात राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळवणे ही गावासाठी गौरवाची बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावातील अनेक ठिकाणी अभिनंदनाचे संदेश झळकले.



