
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागांमधून निवडून देणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकीताई पाटील यांचे नाव आघाडीवर असून त्यांना उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर येथून कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत मोठी चुरस निर्माण झाली होती. यात शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे नाव आघाडीवर होते. यासोबत आमदार किशोर पाटील यांचे पुत्र नगरसेवक सुमीत पाटील यांचे नाव देखील चर्चेत आले.
तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनेक नावे चर्चेत होती. यात प्रामुख्याने उद्योजक नंदू अडवाणी, पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र फडके, डॉ. केतकीताई पाटील, पाचोरा येथील पदाधिकारी अमोल शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर आदी नावांचा समावेश होता. तर भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
या सर्व घडामोडींमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. यात गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या तथा माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या कन्या डॉ. केतकीताई पाटील यांचे नाव या शर्यतीत पुढे असल्याचे दिसून येत आहे. डॉ. उल्हासदादा यांनी दोन वर्षांपूर्वीच काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. तर, भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतरच डॉ. केतकीताई पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ केला आहे. त्यांनी अल्प काळात उत्तम जनसंपर्कासह आपल्या कामाची छाप उमटवली असून याचमुळे त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चीत झाल्याचे मानले जात आहे. याबाबत कोणत्याही क्षणाला घोषणा होण्याची शक्यता आहे.



