
भोपाळ-वृत्तसेवा । भोपाळमधील चर्चेतील ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत माजी न्यायाधीश आणि ट्विशा शर्मा यांच्या सासू गिरिबाला सिंह यांना अटक केली आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर सीबीआयने तत्काळ हालचाल करत त्यांची सुमारे सहा तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. या घडामोडीनंतर भोपाळसह संपूर्ण मध्य प्रदेशात या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सीबीआयचे तीन अधिकारी गिरिबाला सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले. तपास पथकाने घराची पाहणी करत डिजिटल नकाशा तयार केला. यावेळी त्यांच्या घराबाहेर हालचाली वाढल्या होत्या. तपासादरम्यान गिरिबाला सिंह यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सीबीआयच्या पथकाने मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या परिसरात नेल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सीबीआयने भोपाळमध्ये स्वतंत्र कॅम्प ऑफिस उभारण्याची तयारी सुरू केली असून यासाठी शहर पोलीस आयुक्तांकडे जागेची मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला. न्यायालयाने गिरिबाला सिंह यांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेल्या प्राथमिक पुराव्यांची गंभीर दखल घेतली. व्हॉट्सॲप चॅट्स, साक्षीदारांचे जबाब आणि आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्याविरोधात स्पष्ट स्वरूपाचे आरोप असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तपासात अपेक्षित सहकार्य न केल्याचाही उल्लेख आदेशात करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला कोणताही दिलासा देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले.
सुनावणीदरम्यान सीबीआयने न्यायालयात अनेक गंभीर मुद्दे मांडले. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार ट्विशा शर्मा यांच्या शरीरावर आढळलेल्या जखमांच्या खुणांबाबत सासरच्या मंडळींकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नाही. मेडिकल रिपोर्टच्या आधारे या जखमा मृतदेह खाली उतरवताना झालेल्या नसल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले. याशिवाय सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या काही व्हिडिओंच्या निवडक भागांचा वापर करून पुराव्यांवर परिणाम करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप सीबीआयने केला आहे.
तपासात समोर आलेल्या व्हॉट्सॲप चॅट्सनुसार ट्विशा गरोदर राहिल्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचा दावा सीबीआयने केला आहे. तसेच गर्भपातासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आणि हुंड्यासाठी सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोपही तपासात समोर आला आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर गिरिबाला सिंह यांची कोठडीत घेऊन चौकशी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सीबीआयने न्यायालयात स्पष्ट केले. तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी काही महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



