चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत २.१६६ किलो गांजासदृश पदार्थ जप्त केला असून, या प्रकरणात २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या कारवाईत गांजासदृश पदार्थासह दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई चोपडा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पवन देसले यांनी चहार्डी बीट अंमलदारांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिस पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेत संशयिताचा पाठलाग केला. या कारवाईदरम्यान देवेंद्र गोपीचंद सोनवणे (वय २२, रा. आहिरे, पोस्ट सोनवद, ता. धरणगाव, जि. जळगाव) याच्याकडून गांजासदृश पदार्थ आढळून आला.

पोलिसांनी जप्त केलेल्या पदार्थाचे वजन केल्यानंतर ते २ किलो १६६ ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. या पदार्थाची किंमत ३० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, ९० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची टीव्हीएस अपाचे दुचाकी (क्रमांक एमएच १९ ईएन ६४८३) आणि १५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला तातडीने अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकारी, अपर पोलिस अधिकारी आणि चोपडा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



