Home क्राईम वरणगावातील गोळीबाराचा लागला छडा ! दोन संशयितांना अटक

वरणगावातील गोळीबाराचा लागला छडा ! दोन संशयितांना अटक

0
3

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करून तरुणाला भेटण्यासाठी बोलावले आणि त्याच्यावर लोखंडी सळईने हल्ला करत गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना वरणगाव येथे घडली होती. या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन संशयितांना अटक केली आहे. २०२१ मध्ये झालेल्या मारहाणीचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हा सुनियोजित कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता मुक्ताईनगर येथील काझीपुरा परिसरातील सरफराज सय्यद सकिर सय्यद (वय २४) याला इन्स्टाग्रामवरील एका तरुणीच्या नावाने तयार केलेल्या ‘@ashwini2083’ या खात्यावरून मेसेज आणि कॉल करण्यात आले. त्याला वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते. सरफराज ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर लोखंडी सळईने हल्ला चढवला. डोक्यावर सलग दोन वार करून त्याला खाली पाडण्यात आले, तसेच पायावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यानंतर एका आरोपीने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून सरफराजवर दोन राऊंड गोळीबार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. हल्ल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत संबंधित इन्स्टाग्राम खाते डिलीट किंवा निष्क्रिय करण्यात आले होते. मात्र, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या खात्याच्या वापरासाठी आरोपी भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे याने आपल्या अल्पवयीन मित्राच्या मोबाईलमधील ई-मेलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०, रा. फेकरी, ता. भुसावळ) आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे (वय २७, रा. फेकरी, ता. भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतले. भूषण बारावी शिक्षित असून सिद्धार्थ बी.ए. पदवीधर असून ग्रामपंचायत सबकंत्राटदार म्हणून काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या चौकशीत या हल्ल्यामागील धक्कादायक कारण समोर आले. १८ एप्रिल २०२१ रोजी बोदवड-मुक्ताईनगर महामार्गावर वाहनाच्या अपघातादरम्यान सिद्धार्थ ढिवरे आणि भूषण सावळे यांचा सरफराज सय्यद व त्याच्या मित्रांशी वाद झाला होता. या वादातून सरफराज आणि त्याच्या साथीदारांनी आरोपींच्या वाहनाची तोडफोड करून त्यांना काठ्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओही तयार करण्यात आला होता. त्यावेळी झालेला अपमान आरोपींच्या मनात कायम होता. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी पोलिसांत तक्रार न देता सरफराजवर हल्ला करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

या कटानुसार भूषण सावळे याने आपल्या मैत्रिणीशी संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या ‘@ashwini2083’ या इन्स्टाग्राम खात्याचा वापर केला. सरफराजने १७ ऑक्टोबर २०२६ पासून या खात्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर आरोपींनी तरुणीच्या नावाने त्याच्याशी संवाद सुरू केला. १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून त्याच्याशी चॅटिंग करून सायंकाळी वरणगाव येथे भेटण्यासाठी बोलावण्यात आले. सरफराज घटनास्थळी पोहोचल्यानंतर सिद्धार्थ आणि भूषण दुचाकीवरून तेथे आले. त्याला पाहताच लोखंडी सळईने डोक्यावर वार करून खाली पाडले. त्यानंतर भूषणने गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भूषणने मोबाईलमधील इन्स्टाग्राम खाते तातडीने निष्क्रिय केले.

गुन्ह्यात वापरलेल्या गावठी कट्ट्याबाबत चौकशी केली असता, हा कट्टा त्यांचा पूर्वीचा साथीदार सागर कहार (वय २५, रा. भुसावळ) याने अपघातात मृत्यू होण्यापूर्वी भूषणला दिल्याचे समोर आले आहे. सागर कहार याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात २०१७ ते २०२१ या कालावधीत शस्त्र अधिनियम, मारहाण, चोरी, सरकारी कामात अडथळा आणि अन्य विविध स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला गावठी कट्टा, दुचाकी आणि मोबाईल याबाबत आरोपींकडे पुढील तपास सुरू आहे. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे, संतोष पवार आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.


Protected Content

Play sound