चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिकवणीवरून मित्रांसोबत सायकलने घरी परतणाऱ्या अवघ्या १२ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चोपडा शहरातील श्रीरामनगर परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. सायकलला धडक देऊन बालकाला खाली पाडल्यानंतर त्याला गोणपाटात टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, बालकाने केलेला आरडाओरडा, सोबतच्या विद्यार्थ्यांनी दाखविलेले धाडस आणि परिसरातील महिलांसह नागरिकांनी तत्काळ केलेली मदत यामुळे अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले. घटनेनंतर दोन्ही संशयित अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
श्रीरामनगरच्या स्वागत फलकापासून काही अंतरावर सोमवारी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित १२ वर्षीय विद्यार्थी शिकवणी संपवून आपल्या मित्रांसोबत सायकलने घरी जात होता. यावेळी अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्याच्या सायकलला पाय मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर त्याला गोणपाटात टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बालक घाबरला आणि त्याने मोठ्याने आरडाओरडा सुरू केला.

बालकाचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकून त्याच्यासोबत असलेल्या विद्यार्थी मित्रांनी तत्काळ आरडाओरडा केला. जवळच असलेल्या घरांमधील महिलांनाही हा आवाज ऐकू आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घराबाहेर धाव घेत बालकाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांचे धाडस आणि महिलांसह नागरिकांची तत्परता पाहून संशयितांचे बेत फसले. नागरिकांची गर्दी जमू लागल्याचे लक्षात येताच दोन्ही इसम घटनास्थळावरून पसार झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर घाबरलेल्या बालकाने आपल्यासोबत घडलेला प्रकार परिसरातील महिलांना सांगितला. आवाज ऐकून अन्य नागरिकही घटनास्थळी जमा झाले. यावेळी एका विद्यार्थ्याने संशयितांच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या मागे मध्य प्रदेश पासिंगची एक इको व्हॅन उभी असल्याचे त्याने सांगितल्याने घटनेचे गांभीर्य आणखी वाढले. दुचाकीवरील दोघे आणि संबंधित व्हॅन यांच्यात काही संबंध आहे का, यासह अन्य बाबींचा तपास होणे आवश्यक आहे.
दरम्यान, सेवानिवृत्त शिक्षक दिनेश बाविस्कर हे श्रीरामनगर परिसरातून जात असताना हातेड येथील त्यांच्या नातेवाईक महिलेने त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून बाविस्कर यांनी तातडीने चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकार कळविला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देसले यांनी तत्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना केले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविली. महामार्गावरील तसेच सीमावर्ती भागातील चेकपोस्टशी संपर्क साधण्यात आला. संबंधित अल्पवयीन बालक आणि त्याच्या पालकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. तसेच घटनास्थळ आणि परिसरातील अन्य ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. संशयितांची ओळख पटविणे, त्यांच्या वाहनांचा माग काढणे आणि घटनेमागील नेमके कारण शोधणे या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे चोपडा शहरातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिकवणीवरून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी अल्पवयीन मुलांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या घटनेत बालकाच्या मित्रांनी दाखविलेले धाडस, महिलांनी तत्काळ घराबाहेर पडून केलेली मदत, नागरिकांचे प्रसंगावधान आणि पोलिसांची तातडीची कार्यवाही यांचे परिसरातून कौतुक होत आहे.



