Home क्राईम शेवटचा मेसेज पाठवून राजू नेरकर यांची शेळगाव बॅरेजमध्ये उडी; पुलावर स्कूटर, चप्पल...

शेवटचा मेसेज पाठवून राजू नेरकर यांची शेळगाव बॅरेजमध्ये उडी; पुलावर स्कूटर, चप्पल अन् आधार कार्ड आढळले!

0
3

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील शेळगाव बॅरेजच्या पुलावरून जळगाव येथील एका व्यक्तीने पाण्यात उडी घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. पुलावर संबंधित व्यक्तीची स्कूटर, चप्पल आणि आधार कार्ड आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पाण्यात उडी घेतलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास जळगावच्या दिशेने एक व्यक्ती एमएच-१९-ईआर-९४८४ क्रमांकाच्या नव्या जुपिटर स्कूटरवरून शेळगाव बॅरेज परिसरात आली. नागरिकांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून खुल्या करण्यात आलेल्या बॅरेजच्या पुलावर या व्यक्तीने आपली स्कूटर उभी केली.

त्यानंतर संबंधित व्यक्तीने पुलावर स्वतःची चप्पल आणि ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड ठेवले. काही क्षणांतच तिने बॅरेजच्या पाण्यात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पुलावर नागरिकांची मोठी गर्दी जमली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पुलाची पाहणी करून घटनास्थळी आढळलेली जुपिटर स्कूटर, चप्पल आणि आधार कार्ड ताब्यात घेतले आहे. आधार कार्डाच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून, ती व्यक्ती जळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बॅरेजमधील पाण्याची खोली आणि प्रवाह लक्षात घेता शोधकार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून पाण्यात उडी घेतलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संबंधित व्यक्तीने नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, या घटनेबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाण्यात उडी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव राजू नेरकर असल्याचे समजते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या नातेवाईकांना आपण आत्महत्या करीत असल्याचे संदेश पाठविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. यावल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून, बॅरेजच्या पाण्यात त्यांचा शोध सुरू आहे.

Protected Content

Play sound