अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पातोंडा आणि दहिवद परिसरातील शेती शिवारात विहिरी व बोअरवेलच्या महागड्या केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या चोरीच्या सत्राला आळा बसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. केबल चोरीबरोबरच गुरे चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही चोरट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने संतप्त शेतकरी अमळनेर-चोपडा महामार्गावर रास्ता रोको करण्याच्या तयारीत होते.
शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पातोंडा आणि दहिवद परिसरात सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने रात्री शेतात जाण्याची गरज कमी झाली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत चोरटे रात्रीच्या वेळी शेतातील विहिरी आणि बोअरवेलमधील महागड्या केबल काढून नेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. केबल चोरी केल्यानंतर त्यातील तांबे वेगळे करण्यासाठी चोरटे शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या एकत्र करून त्यांना आग लावतात. या आगीत केबल वितळवून त्यातील तांबे काढले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे केबल चोरीबरोबरच ठिबक सिंचन साहित्याचेही नुकसान होत आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या प्रकारामुळे दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अशा घटना घडत असून संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस, महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्याचे सांगितले. मात्र, चोरीच्या घटनांमध्ये घट होत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या सहा दिवसांत दोनदा चोरीच्या घटना घडल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. केबल चोरीमुळे पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही शेतकऱ्यांनी उधारीने पैसे घेऊन नव्या केबल खरेदी केल्या. मात्र, चोरट्यांनी पुन्हा त्याच नव्या केबलवर डल्ला मारल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अधिकच वाढले. पिकांना पाणी देण्याची गरज असताना वारंवार केबल चोरी होत असल्याने शेतीचे नियोजनही विस्कळीत होत आहे.
या सततच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात अमळनेर-चोपडा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याची तयारी सुरू केली होती. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली. पोलिसांनी चोरीच्या घटनांचा पंचनामा करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले. तसेच परिसरात रात्रीची पोलीस गस्त सुरू करण्यात येईल, असेही सांगितले. सध्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट असून नैसर्गिक आणि आर्थिक संकटांचा सामना करत ते रब्बी हंगामातील पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतातील केबल, यंत्रसामग्री आणि गुरे चोरीला जाणे हे शेतकऱ्यांसाठी मोठे संकट ठरत आहे. हिवाळा सुरू झाल्यानंतर रात्रीच्या वेळी चोरट्यांचा वावर वाढत असल्याचीही शेतकऱ्यांची तक्रार आहे.
केवळ तात्पुरती गस्त न लावता केबल चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चोरी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, तसेच पातोंडा आणि दहिवद परिसरातील शेती शिवारात नियमित रात्रीची गस्त घालावी, अशा मागण्यांचे निवेदन संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांना दिले आहे. चोरीच्या घटनांकडे लोकप्रतिनिधींकडूनही दुर्लक्ष होत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस परिणाम दिसत नसल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. यापुढेही चोरीच्या घटनांना आळा बसला नाही, तर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.



