Home Cities यावल सावद्यात शिवसेनेचा सामाजिक उपक्रम ; दिवाळीनिमित्त गरीब व गरजू कुटुंबांना शिधावाटप

सावद्यात शिवसेनेचा सामाजिक उपक्रम ; दिवाळीनिमित्त गरीब व गरजू कुटुंबांना शिधावाटप

0
2

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने आणि उत्साहात साजरा करता यावा, आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गरीब कुटुंबाचा सण हिरमुसू नये, या सामाजिक भावनेतून सावदा शहरात शिवसेनेच्या वतीने गरीब व गरजू नागरिकांना दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत (भाऊ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण मानला जातो. मात्र, आर्थिक अडचणींमुळे अनेक गरजू कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा आणि त्यांच्या घरात सणाचा उत्साह निर्माण व्हावा, या उद्देशाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमांतर्गत सावदा शहरातील गरजू कुटुंबांना दिवाळीचा शिधा देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना सणाच्या काळात मदतीचा आधार मिळाला. केवळ राजकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याच्या भूमिकेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.

या उपक्रमात सावदा शिवसेना शहरप्रमुख तथा नगरपालिका नगरसेवक सुरज परदेशी, शहर संघटक निलेश खाचणे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष वैशाली पाटील, महिला आघाडीच्या रीता भंगाळे, गौरव वानखेडे, दीपक बडगे, नितीन सपकाळे, भूषण परदेशी आणि ओम सापकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘जनसेवा परमो धर्म’ हे ब्रीद जपत शिवसेना नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. समाजातील गरीब आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound