Home Cities जळगाव भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामांची मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी 

भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामांची मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी 

0
2

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव, जामनेर आणि पाचोरा तालुक्यांतील शेतीला सिंचनाची खात्रीशीर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी २३ नोव्हेंबर रोजी प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या महत्त्वाकांक्षी योजनेतून सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष शेतापर्यंत पाणी कधी पोहोचणार, याकडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भागपूर धरणातून पाणी उचलून अजिंठा डोंगराच्या पायथ्यापर्यंतच्या शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचे या प्रकल्पाचे नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला सुधारित मान्यता दिली असून, ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाची अंदाजित किंमत ३ हजार ५३३ कोटी ५ लाख रुपये आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जळगाव तालुक्यातील २६ गावांमधील शेतीला थेट सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यामध्ये चिंचोली, कंडारी, उमाळे, पाथरी, धानवड, शिरसोली प्र. बो., दापोरे, जावखेडे आणि देव्हारी यांसह अन्य गावांचा समावेश आहे. या गावांतील शेतकऱ्यांना पिकांच्या गरजेनुसार वेळेत पाणी उपलब्ध झाल्यास शेती उत्पादनाला मदत होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात सुमारे ४४.५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीद्वारे ९८.३५ दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे पाणी जळगाव, जामनेर आणि पाचोरा तालुक्यांतील पाच मध्यम व ४४ लघु सिंचन प्रकल्पांमध्ये साठविण्यात येणार आहे. या माध्यमातून आणखी १६ हजार ८६० हेक्टर क्षेत्राला अधिक खात्रीशीर सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. विविध सिंचन प्रकल्पांमध्ये पाणी साठविल्यामुळे संबंधित परिसरातील शेतीला मोठा आधार मिळण्याची अपेक्षा आहे. भागपूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यातील एकुलती येथे साठवण तलाव, तर पाचोरा तालुक्यातील लोहारा परिसरात गोलटेकडी लघु पाटबंधारे तलाव उभारण्यात येणार आहे. या दोन्ही तलावांसह संबंधित कामांसाठी ८० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी सप्टेंबर महिन्यात दिली होती. या कामांमुळे प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी साठवण आणि वितरण व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.

मंत्री महाजन यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली. जळगाव, जामनेर आणि पाचोरा या तीन तालुक्यांतील मोठ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाचे काम वेळेत आणि नियोजनानुसार पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रगतीकडे लाभक्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आहे. या पाहणीप्रसंगी जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, महाराष्ट्र राज्याचे माजी माहिती आयुक्त व. द. पाटील, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश मोरे आणि जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन उपस्थित होते. तसेच जळगाव उपसा सिंचन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रल्हाद पांडुरंग वराडे, जळगावच्या संकल्पचित्र उपविभागीय पथक क्रमांक ३ चे सहायक अभियंता (श्रेणी १) चंद्रशेखर सुभाष खंबायत आणि कंत्राटदाराचे प्रतिनिधी किरण अडाव यांचीही उपस्थिती होती.


Protected Content

Play sound