महिला डॉक्टरची १ लाख २४ हजार ९९२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सैन्य दलातील जवानांची वैद्यकीय तपासणी करायचे असल्याचे सांगत फोन पे ची संपूर्ण माहिती घेऊन डॉ. सुजाता प्रमोद महाजन (वय- ६२, रा. गांधीनगर, जिल्हापेठ) या महिला डॉक्टरांची १ लाख २४ हजार ९९२ रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना २१ मे रोजी घडली. याप्रकरणी सोमवार, १० जून रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. सुजाता महाजन यांना २० मे रोजी अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांना सैन्य दलातील अधिकारी बोलत असून तुमच्याकडे जवानांची तपासणी करायचे असल्याचे सांगितले. त्याने व्हिजिटिंग कार्ड मागविले. डॉक्टरांच्या चालकाने त्याच्या मोबाईलवरुन कार्ड पाठवले. दुसऱ्या दिवशी २१ मे रोजी दुपारी १२ वाजता महिला डॉक्टरच्या पतीशी समोरील व्यक्ती बोलून त्याने ४० ते ५० जवानांची तपासणी करायचे असल्याचे सांगितले. डॉ. प्रमोद महाजन यांनी पत्नी डॉ. सुजाता महाजन यांचा फोन पे क्रमांक दिला. त्यावेळी ठगाने डॉ. सुजाता महाजन यांच्याकडून फोन पे ची संपूर्ण माहिती घेतली. बोलणे सुरू असतानाच डॉ.सुजात महाजन यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होवू लागले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून १ लाख २४ हजान ९९२ रुपये ट्रान्सफर झाले. दरम्यान आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी १० जून रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे हे करीत आहे.

Protected Content