समितीची विवेकवादी वाटचाल मोठ्या प्रमाणात विस्तारली : विनायक सावळे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशात सध्या आंतर्विसंगती सुप्त पद्धतीने वाढताना दिसत आहे. संविधानात समानता तर आहे मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे दिसत आहे. समितीची विवेकवादी वाटचाल सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. समितीचे कार्यक्षेत्र विस्तारले असून जिल्ह्यात २१ शाखांमध्ये आगामी काळात नाविन्यपूर्ण प्रशिक्षणे घेतली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी दिली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा संकल्प व प्रेरणा मेळावा रविवारी दि. ९ रोजी नूतन मराठा महाविद्यालयात झाला. यावेळी निरीक्षक म्हणून विनायक सावळे उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती राज्य वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी व सुनील वाघमोडे यांची होती. सुरुवातीला दिवंगत कार्यकर्त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रस्तावनेत, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी मेळाव्याविषयी माहिती दिली.

प्रसंगी पदोन्नती मिळाल्याबद्दल शिरीष चौधरी, शिवचेतना सन्मान मिळाला म्हणून सुनील वाघमोडे आणि उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जामनेर शाखेचा निरीक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाखांनी आपला अहवाल सादर केला. त्यानंतर विनायक सावळे यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र अंनिस चळवळीला देशभरातून मागणी सातत्याने वाढत आहे. चळवळीचे काम गतीने चालत असून कार्यकर्ते अपुरे पडत आहे. मात्र चिकाटीने आणि सामाजिक सहकार्याने समितीची आश्वासक यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन विनायक सावळे यांनी केले. शाखांनी आपल्या ठिकाणी नियमित बैठक घेणे, विविध उपक्रम राबविणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर जिल्हा कार्यकारिणी एकमताने निवड करण्यात आली.

बैठकीला जिल्ह्यातील विविध शाखांचे ३५ कार्यकर्ते उपस्थित होते. शहर शाखा कार्याध्यक्षा कल्पना चौधरी यांनी बैठकीअंती आभार मानले. “हम होंगे कामयाब” गीताने समारोप झाला. बैठक यशस्वीतेसाठी शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनि परिश्रम घेतले.

Protected Content