किरकोळ कारणावरून दोन भावांना बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहू नगर येथे किरकोळ कारणावरून दोन भावांना प्लास्टीकच्या पाईपाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी रविवारी ९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शाहू नगरातील, हनुमान मंदीराजवळ मयुर शशिकांत रानवडे हे आपल्या आईवडील व काकासोबत वास्तव्याला आहे. त्याच्या परिसरात समीर उर्फ बिहारी व सुमेर तडवी हे देखील राहतात. समीर बिहारी आणि सुमेर तडवी यांना सोईस्कर जाण्या येण्यासाठी दुसरा रस्ता असतांना दोघे मयूरच्या घरासमोरून जातात. त्यामुळे त्यांच्या घरात असलेली मुलगी घबरते. दरम्यान, ८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घराकडून का जातात असा जाब मयूर व त्याचा भाऊ कल्पेश यांनी विचारला. याचा राग आल्याने समीर बिहारी आणि सुमेर तडवी या दोघांनी प्लास्टीकचा पाईपाने दोन्ही भावांना बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी रविवारी ९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मयुर रानवडे याने दिलेल्या फिर्यादीवरून समीर बिहारी आणि सुमेर तडवी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उल्हास चऱ्हाटे करीत आहे.

Protected Content