व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर महागला

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । सरकारी तेल कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केलीय. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 73.5 रुपयांनी वाढ केली.

 

दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,500 रुपयांवरून 1623 रुपये प्रति सिलिंडर झाली. तेल कंपन्यांनी सामान्य माणसाने वापरलेल्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या नाहीत.  दिल्लीमध्ये 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 834.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ केली होती.

 

विनाअनुदानित 14.2 किलो सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 834.50 रुपये, कोलकात्यात 861 रुपये, मुंबईत 834.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 850.50 रुपये प्रति सिलिंडर आहे.

 

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सर्वाधिक वाढ चेन्नईमध्ये 73.50 रुपये प्रति सिलिंडर झाली. दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 73 रुपयांनी वाढून 1623 रुपये झाली. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 72.50 रुपयांनी वाढून 1629 रुपये, मुंबईत 72.50 रुपयांनी वाढून 1579.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 73.50 रुपयांनी 1761 रुपये प्रति सिलिंडर झाली.  (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

 

एलपीजी ग्राहक त्यांचे इच्छित वितरक निवडू शकतात आणि सिलिंडर पुन्हा भरू शकतात. सुरुवातीच्या टप्प्यात ही सुविधा जून 2021 मध्ये चंदीगड, कोईंबतूर, गुडगाव, पुणे आणि रांची येथे सुरू करण्यात आली.

 

Protected Content