…म्हणून फडणवीसांना पोटदुखी झाली असू शकते : उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. त्यामुळे कोण काय बोलते याकडे मी लक्ष देत नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी कुठेही न फिरता चांगले काम करु शकतो. यामुळेच विरोधकांना पोटदुखी झाली असू शकते, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांना टोला लगावला. ते शनिवारी दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

 

 

या मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस याच्या अलीकडच्या दिल्ली भेटीविषयी विचारले. त्यावर उद्धव यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस दिल्लीतील कोरोना परिस्थितीची पाहणी करायला गेले असतील. त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करत असल्याचे उद्धव यांनी म्हटले. राज्यातल्या परिस्थितीचे अपडेट्स त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून देणे कितपत योग्य आहे, अशा विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, कोण काय म्हणतेय, कोण काय करतेय इकडे मी लक्ष देत नाही. मी पुन:पुन्हा सांगतो की, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही. यांचे ठिक आहे. हे बोलतील बोलत राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल, कारण कोरोनाची लक्षणं वेगवेगळी आहेत. मंत्रालय आता बंद आहे. आज तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं आहे. तुम्ही त्याचा योग्य वापर करु शकत नसाल तर तुमच्यासारखे दुर्भाग्य असणारे तुम्हीच आहात. आता मुलाखत झाल्यानंतर घरी जाऊन मी महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांच्याबरोबर बैठक घेणार आहे. हे रोजचं चाललं आहे. विदर्भातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक मी काल व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन घेतली. परवा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांची एक व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. म्हणजे एका वेळेस घरात बसून मी सगळीकडे जाऊ शकतो. मी पूर्ण राज्य कव्हर करतोय आणि निर्णय घेतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Protected Content