महामार्ग रिकामा करा म्हणत शेतकऱ्यांच्या विरोधात आता स्थानिकांचे आंदोलन

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असलेल्या सिंघू बॉर्डरवर आणखी एक आंदोलन सुरू झालं आहे. या परिसरातील रहिवासी असल्याचा दावा करत काही नागरिकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी मोर्चा काढला. महामार्ग मोकळा करण्याची मागणी करत स्थानिकांनी निदर्शनं केली.

दिल्लीच्या सीमेवरील सिंघू बॉर्डरवर सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास रोखल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डरवर मुक्काम ठोकत आंदोलन सुरू केलं. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाला हिंसेचं गालबोट लागलं. त्यावरून वादंग निर्माण झालेलं असताना अचानक सिंघू बॉर्डर आणखी एक आंदोलन सुरू झालं.

बुधवारी दुपारी अचानक सिंघू बॉर्डर परिसरातील रहिवाशी असल्याचा दावा करत नागरिक व युवक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी जमा झाले. त्यानंतर घोषणाबाजी करत स्थानिक आंदोलकांनी दिल्ली महामार्ग रिकामा करण्याची मागणी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे आपल्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असं आंदोलन करणाऱ्या स्थानिकांनी म्हटलं आहे.

 

प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व नेत्यांना लुक आउट नोटीसही पाठवण्यात आली असून, त्यांनी देशाबाहेर जाऊ नये यासाठी त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. राकेश टिकैत, दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबिरसिंह राजेवाल, बुटासिंग बुर्जगिल, योगेंद्र यादव, मेधा पाटकर आणि जिगिंदर सिंह उग्रहा यांच्यासह ३७ शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नावं एफआयआरमध्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचाराबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Protected Content