कोरोना लसी बनवणाऱ्या वैज्ञानिकांना ‘भारतरत्न’ द्या

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी कोरोनाची लस निर्मिती करणाऱ्यांना सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलीय.

 

पंतप्रधान मोदींना गुप्ता यांनी पत्र लिहिलं आहे. देशातील प्रतिभावान वैज्ञानिकांनी खूप कमी वेळामध्ये फार काम केलं असून स्वदेशी लसींच्या माध्यमातून देशातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्याच्या या कार्यासाठी १५ ऑगस्टनिमित्त या वैज्ञानिकांना सन्मानित करण्यात यावं अशी मागणी गुप्ता यांनी मोदींकडे केलीय.

 

गुप्ता यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये  स्वदेशी लसींची निर्मिती करणाऱ्या वैज्ञानिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना भारतरत्नसारखा मोठा सन्मान देऊन गौरवण्यात यावं असं म्हटलं आहे. जागतिक महासाथीमुळे सर्वसामान्य आयुष्य, व्यापार आणि नियोजनाला मोठा फटका बसलाय.  दोन लाटा भारतात येऊन गेल्या त्यामध्ये अनेकांनी जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून संपूर्ण देशासोबत झारखंडही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या अघोषित युद्धामध्ये लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं या पत्रामध्ये गुप्ता यांनी म्हटलं आहे.

 

देशांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या लसी आणि लसीकरणासंदर्भातील नियोजनबद्ध कार्यक्रमामध्ये अनेकांना  संसर्गापासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळाल्याचंही गुप्ता यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. लसीकरणामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढली. त्यामुळे या साथीचा प्रभाव नियंत्रणात ठेवण्यात यश मिळालं. यामुळे जागतिक स्तरावर आत्मनिर्भर भारताचा संदेश पोहचला, असंही गुप्ता यांनी म्हटलं आहे.

 

खूप कमी वेळामध्ये संरक्षण मिळवण्यासाठी लसींची निर्मिती करण्याच्या कामामध्ये सहभागी असणाऱ्यांचे पंतप्रधान मोदींनी देशाच्या वतीने जाहीर आभार मानले पाहिजेत, अशी इच्छाही गुप्ता यांनी व्यक्त केलीय. पंतप्रधान मोदींनी असं केल्यास या वैज्ञानिकांकडे देशातील युवा पिढी आदर्श म्हणून पाहतील, असंही गुप्ता म्हणालेत.

 

फायझर-बायोएनटेकच्या लसीच्या निर्मितीमध्ये अर्धा वाटा असणाऱ्या जर्मनीतील बायोएनटेक कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या  डॉ. उजूर साहान आणि त्यांची पत्नी ओझल तुरेशी या जोडप्याचा जर्मन सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केलाय.  फायझरची लस शोधण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या या जोडप्याचा ‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ मेरीट विथ स्टार’ हा जर्मनीमधील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

Protected Content