भाजपचे सर्वच नेते सज्जन आहेत का ? संजय राऊत

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ईडीने मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांवर कारवाई केल्यानंतर आज संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत या पक्षातील सर्वच नेते सज्जन आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

 

काल मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. यावर आज संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. येथे एका वाहिनीशी बोलतांना राऊत म्हणाले की, आम्ही पंतप्रधान कार्यालयात आणि ईडीकडे सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचं लक्ष नाही. केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू आहे. काल पाटणकरांवर कारवाई केली. त्या कारवाई मागचं सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावं. हे नीट समजून घ्या. चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत. हळूहळू त्या गोष्टी बाहेर येतील. ही आमच्याविरोधातील बदनामीची मोहीम आहे. हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही. मी पूर्ण विश्वासाने सांगतो आत्मविश्वासाने सांगतो हे तुमच्यावर उलटणार आहे, असा इशाराही त्यांनी दिलं.
राऊत पुढे म्हणाले की, सोमय्यांना काहीही बोलू देत. त्यांच्या बोलण्याला कोण विचारतं. ते काहीही बोलतात. हवाला किंगशी भाजपचे काय संबंध आहेत याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला दिलेत ना. त्यापुराव्याबाबत मला पोचपावती आले आहे. त्यावर करतंय का ईडी कारवाया? भाजपच्या घोटाळ्यावर सोमय्या बोलले का? सोमय्यांनी ज्या नेत्यांविरोधात ईडीकडे कारवाईची मागणी केली, ज्या नेत्यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली, ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर सोमय्यांची वाचा गेली. अशा माणसावर काय विश्वास ठेवायचा? असा सवालही त्यांनी केला.

तसेच भाजपमध्ये सर्वच चांगले आहेत का? असा एकही व्यक्ती भाजपमध्ये नाहीये का? भाजप नेते रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का? सर्वच रस्त्यावर बसून भीक मागत आहेत का? कुणी चने विकतंय, कुणी भेळपुरी विकतंय, कुणी पावभाजींची गाडी लावून जगत आहेत असं काही आहे का?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला.

Protected Content