विधानसभेत गृहमंत्री देशमुख – फडणवीस यांच्यात जुंपली

 

मुंबई: वृत्तसंस्था । मनसुख हिरेन संशायस्पद मृत्यूवरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात विधानसभेत चांगलीच जुंपली.

 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आरोप केल्यानंतर तुम्ही कुणाला वाचवत आहात? असा सवाल फडणवीस यांनी करताच अर्णव गोस्वामींना आत टाकलं म्हणून तुमचा वाझेंवर राग आहे का?, असा पलटवार अनिल देशमुख यांनी केला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

 

मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिवेशनात येऊन अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभेत या विषयावर निवेदन दिलं. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूची माहिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले. हिरेन यांचा मृतदेह सापडला असून त्यांचे हात बांधलेले होते. त्यांच्या मृतदेहाचे फोटो मी पाहिले आहे. हात बांधून कोणी आत्महत्या करत नाहीत. क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्वात आधी गोस्वामी पोहोचले कसे? वाझे यांच्याकडेच या गुन्ह्याचा  तपास कसा ? असा सवाल फडणवीस यांनी केला.

 

त्यावर सापडलेली गाडी हिरेन यांच्या मालकीची नव्हती. त्यांच्या मित्राची गाडी होती. त्यांचे हात बांधलेले नव्हते. ठाण्यात पोस्टमार्टम होत आहे. त्यातून सर्वा माहिती पुढे येईलय  तपास वाझे करत नसून नितीन अलकनुरे करत आहेत, असं सांगत देशमुख यांनी फडणवीसांचे सर्व मुद्दे खोडून टाकले. त्यानंतर पुन्हा फडणवीसांनी उभं राहून गृहमंत्र्यांच्या निवेदनाला आक्षेप घेतला आणि त्यांनी थेट हिरेन यांनी पोलिसांना दिलेला कबुली जवाब वाचून दाखवला. हिरेन यांनी ही गाडी विकत घेतली असल्याचं कबुली जबाबात म्हटलं आहे. पोलीस तुम्हाला माहिती देत नाही का? पोलीस तुम्हाला चुकीचं ब्रिफिंग करत आहेत का? असा सवाल फडणवीस यांनी केला. अलकनुरे यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी तपास दिला आहे. सात दिवस तर वाझेच तपास करत होते, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

 

फडणवीसांच्या या आरोपावर देशमुखांचा पारा अधिकच चढला. सचिन वाझे… सचिन वाझे काय घेऊन बसला आहात. अर्णव गोस्वामींना आत टाकलं होतं म्हणून तुमचा सचिन वाझेंवर राग आहे का? वाझेंनी अन्वय नाईक प्रकरणात गोस्वामींना अटक केली आणि आत टाकलं, म्हणून तुम्ही राग काढत आहात का? तुमच्याकडे काहीही माहिती असेल तर आम्हाला द्या. पोलिसांना द्या. तपासाला मदतच होईल, असं देशमुख यांनी सांगितलं.

 

तपास करण्यासाठी ठाणे आणि मुंबई पोलीस सक्षम आहे. एएनआयकडे तपास देण्याची गरजच नाही, असंही देशमुख यांनी सांगितलं.

 

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचाही पार चढला. कोण सचिन वाझे? काळा की गोरा आम्हाला माहीत नाही. त्याने काय केलं किती एन्काऊंटर केले त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असं सांगत माझ्याकडे पुरावे आहेत. सीडीआर आहे. स्टेटमेंट आहे. मी हवेत बोलत नाही. त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षनेत्यांचे आरोप गंभीरपणे घेतले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. त्यावर सुशांत सिंह प्रकरणाच्यावेळीही तुम्ही असाच आवाज उठवला. त्यानंतर सीबीआयला प्रकरण दिलं. आज सहा महिने झाले. त्यात काहीच झालं नाही. तुमच्याकडून ब्र शब्दही निघाला नाही. त्यावर बोला ना, असा टोला देशमुख यांनी फडणवीसांना लगावला

Protected Content