जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून रावेर, फैजपूर आणि यावल परिसरात भव्य डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली होती, ज्यापैकी गंभीर समस्या असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया काल जळगाव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात यशस्वीपणे पार पडल्या. योगायोगाने एका बैठकीच्या निमित्ताने जळगाव येथे असलेल्या आमदार अमोल जावळे यांनी आपला वेळ काढून रुग्णालयाला भेट दिली आणि शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांची वैयक्तिकरीत्या विचारपूस करत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

यावेळी आमदारांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या सोयीसुविधांबाबत चर्चा केली. त्यांच्या या भेटीमुळे रुग्णांना मोठा मानसिक आधार मिळाला. या प्रसंगी आमदार जावळे यांच्या समवेत फैजपूरच्या नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ, उपनगराध्यक्षा निकिता कोळी तसेच आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. स्वप्नील सांगळे, डॉ. पंकज पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील आणि डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी या संपूर्ण शस्त्रक्रिया मोहिमेचे नियोजन आणि वैद्यकीय बाजू सांभाळली. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त केवळ भाषणे न करता, थेट समाजोपयोगी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व स्तरातून आमदार जावळे यांचे कौतुक होत आहे.



