यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि प्रशासन अधिक गतिमान व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” किनगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात विविध शासकीय सेवा आणि प्रमाणपत्रांचे थेट वाटप करण्यात आले, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
दि.१७ रोजी पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवणे हे प्रशासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तालुका स्तरावरील शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात महसूल विभागाच्या माध्यमातून विविध महत्त्वाच्या सेवा देण्यात आल्या. जिवंत सातबारा वाटपासह एकूण ११४ वारस नोंदींची नोंदणी करण्यात आली, त्यापैकी २१ प्रकरणांचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. तसेच ९ उत्पन्न दाखले, १३ शिधापत्रिका, ३ जात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तुकडा शेरा कमी करण्याच्या प्रक्रियेत ८८२ तुकडा सातबारा प्रकरणांपैकी ६९४ प्रकरणे पात्र ठरली असून १७ प्रकरणांचे प्रातिनिधिक आदेश देण्यात आले.
याशिवाय अधिवास (Domicile) आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विशेष अर्थसाहाय योजना अंतर्गत ५ लाभार्थ्यांना मदत देण्यात आली, तर ८ लक्ष्मी मुक्ती सातबारा प्रकरणे मार्गी लावण्यात आली. आदिवासी खातेदारांच्या १ नोंदीसह ४ घरकुल लाभ वितरित करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत १६ आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले, तसेच १ ट्रॅक्टरचेही वाटप करण्यात आले.
या अभियानात कृषी विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, तसेच संजय गांधी व इंदिरा गांधी योजना आणि भूमी अभिलेख विभागांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांच्या विविध समस्यांचे तत्काळ निराकरण केले. कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच निवासी नायब तहसीलदार बी.एम. पवार यांनीही विशेष उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी केले. किनगाव मंडळ अधिकारी सलमान तडवी, तलाठी मधुकर खुर्दा, भूषण सूर्यवंशी, अमित राऊत, छाया झटके, खुशबू तडवी तसेच महसूल सेवक गणेश वराडे आणि ज्ञानेश्वर सोळंके यांनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.



