Home पर्यावरण जामूनझिरा पाड्यावर भीषण पाणीटंचाई ; संतप्त ग्रामस्थांचा पंचायत समितीवर धडक मोर्चा, आंदोलनाचा...

जामूनझिरा पाड्यावर भीषण पाणीटंचाई ; संतप्त ग्रामस्थांचा पंचायत समितीवर धडक मोर्चा, आंदोलनाचा इशारा

0
10

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोहराळा ग्रामपंचायत हद्दीतील जामूनझिरा पाड्यावर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न निर्माण झाला आहे. मूलभूत सुविधेपासून वंचित राहिलेल्या आदिवासी नागरिकांनी अखेर संताप व्यक्त करत यावल पंचायत समितीवर धडक मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन सादर केले. पाणीपुरवठ्याची तातडीने व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

जामूनझिरा पाड्यावर गेल्या अनेक आठवड्यांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जामूनझिरा येथील नागरिकांनी यावल पंचायत समिती कार्यालयात धडक देत प्रशासन अधिकारी आय. आर. शेख आणि सहाय्यक अधीक्षक ज्ञानेश्वर निळे यांना निवेदन सादर केले. निवेदनामध्ये पाणीटंचाईमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून महिलांना व लहान मुलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही संताप व्यक्त केला. वेळेवर योग्य नियोजन करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली असती, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा आरोप ग्रामस्थांनी केला. पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनाद्वारे प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला असून, तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही तर यावल पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर प्यारसिंग बारेला, प्रेमसिंग बारेला, बिलरसिंग पावरा, रमा पावरा, मोहन पावरा, गजिराम पावरा, प्रकाश बारेला, हरसिंग बारेला, सबसिंग बारेला, हितेश बारेला, देवसिंग बारेला, सुनिल बारेला यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound