Home क्राईम मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा धुमाकूळ! आधी रुईखेडा, आता उचंदा ; वनविभाग नेमके...

मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा धुमाकूळ! आधी रुईखेडा, आता उचंदा ; वनविभाग नेमके करतेय काय?

0
3

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, वनसंपत्तीची खुलेआम लूट सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी रुईखेडा शिवारात भरदिवसा वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला होता. आता उचंदा परिसरातही अवैध वृक्षतोडीचे प्रकरण समोर येत असल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकापाठोपाठ एक घटना घडत असताना वनविभागाकडून ठोस कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

रुईखेडा परिसरातील वृक्षतोडीचा प्रकार समोर आल्यानंतर आता उचंदा येथेही अशाच प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षांची कत्तल होत असल्याचे प्रकार समोर येत असताना वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी नेमकी काय भूमिका बजावत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला आणखी किती तक्रारी आणि पुराव्यांची आवश्यकता आहे, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.

वनविभागातील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांनी अवैध वृक्षतोडीची माहिती द्यावी, माहिती मिळताच कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका घेतली जात असल्याची चर्चा आहे. मात्र, जंगल आणि वनसंपत्तीचे संरक्षण करणे, अवैध वृक्षतोड रोखणे तसेच संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त घालणे ही वनविभागाची मूलभूत जबाबदारी नाही का? प्रत्येक वेळी नागरिकांनीच माहिती दिल्यानंतर प्रशासनाने हालचाल करायची का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वृक्षतोडीचा प्रश्न केवळ झाडांच्या कत्तलीपुरता मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम पर्यावरणीय संतुलनावर होत आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास परिसरातील जैवविविधता, वन्यजीवांचे अधिवास आणि नैसर्गिक पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणे भविष्यात गंभीर परिणामांना आमंत्रण देणारे ठरू शकते.

रुईखेडा आणि उचंदा परिसरातील अवैध वृक्षतोडीच्या प्रकरणांची वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी, संबंधितांची ओळख पटवून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच अवैध लाकूड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित गस्त आणि तपासणी वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणांमध्ये कोणाचा सहभाग आहे आणि वनविभागाच्या यंत्रणेकडून नेमकी काय कारवाई करण्यात आली, याचीही स्पष्टता मिळणे आवश्यक आहे. आधी रुईखेडा, आता उचंदा… मुक्ताईनगर तालुक्यात आणखी किती ठिकाणी अशा प्रकारे वृक्षांची कत्तल होत आहे? वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदारी निश्चित करणार का, की नागरिकांनी तक्रारी करत राहायचे आणि वनसंपत्तीची लूट सुरूच राहणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.


Protected Content

Play sound