पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत शहरातील एकमेव सीबीएसई संलग्न बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये ‘गुरु पौर्णिमा महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गुरुवंदना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रेरणादायी मनोगतांमुळे संपूर्ण परिसर गुरुजनांप्रती कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संचालक व योगगुरू मुकुंद बोहरा, पीटीए सदस्य योगेंद्र पवार, एसएमसी सदस्य बी. जी. पाटील, संस्थापक सुरेंद्र बोहरा, संचालक डॉ. गौरव बोहरा, प्राचार्या रियंका अरझारे आणि उपप्राचार्या सिमलिना यांच्या हस्ते महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने संस्थेचे चेअरमन, प्राचार्या तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शुभेच्छापत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त केला. उपशिक्षिका श्वेता भोसले यांनी गुरु पौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व उलगडून सांगितले. संचालक मुकुंद बोहरा यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत ज्ञान आणि संस्कार यांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. संस्थेच्या चेअरमन यांनी विद्यार्थ्यांनी आई-वडील आणि शिक्षकांचा कायम आदर करावा, असा संदेश दिला. प्राचार्या रियंका अरझारे यांनी “गुरु हेच अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे खरे मार्गदर्शक असतात,” असे सांगत विद्यार्थ्यांनी गुरुजनांविषयी कृतज्ञता कायम ठेवावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमात इयत्ता नववीतील विद्यार्थी आकाश महाजन, मोहित पाटील आणि इशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गुरुवंदनेने वातावरण भक्तिमय झाले, तर इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याविष्काराने उपस्थितांची दाद मिळवली. या नृत्याला नृत्य शिक्षक प्रवीण जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी पाटील, हर्षदा पाटील, सार्थक लोहार आणि प्रज्वल लोहार यांनी प्रभावीपणे केले. सांस्कृतिक समितीच्या प्रमुख काजल भरैय्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन रुपाली चौधरी यांनी केले.



