जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुरूपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात भक्तिमय आणि कृतज्ञतापूर्ण वातावरणात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध विभागांतील अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी माजी खासदार तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. उल्हास पाटील यांना वंदन करून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करत ज्ञान, संस्कार आणि सेवाभाव जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
महाविद्यालयातील अकाउंट विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने डॉ. उल्हास पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. विजय बाविस्कर, बांधकाम विभागाचे संजय भिरूड यांच्यासह विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होते. याचप्रमाणे गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही डॉ. उल्हास पाटील यांना पुष्पगुच्छ अर्पण करून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गुरुजनांविषयीचा सन्मान जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, रजिस्ट्रार चेतन चौधरी आणि डॉ. मुकेश चौधरी यांनी देखील डॉ. उल्हास पाटील यांना गुरूपौर्णिमेनिमित्त वंदन केले. शिक्षण, आरोग्य सेवा आणि समाजकारण या क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. गुरूपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान करणारा दिवस असून, या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विविध शैक्षणिक संस्थांमधील अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.



