जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापूर परिसरात शनिवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, संतप्त नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
सकाळी सुमारे ९ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा रात्रीपर्यंतही पूर्ववत न झाल्याने परिसर अक्षरशः अंधारात बुडाला. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, पाणीटंचाई आणि दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वीज विभागाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही वेळा फोनच उचलला गेला नाही, तर काही वेळा “थोड्याच वेळात वीज येईल” असे सांगून वेळकाढूपणा करण्यात आल्याचा नागरिकांचा दावा आहे. या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला.
अखेर संतप्त नागरिकांनी श्याम फायरजवळ रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन छेडले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. त्यामुळे आता प्रशासन आणि वीज विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात भाजप कार्यकर्ते वसीम बापू, मिलिंद सोनवणे, मुस्तफा खटीक, इमरान पटेल, जुबेर शेख, गोविंद कांबळे, रिजवान बागवान, शाहनवाज बागवान आणि अजमल खान यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.



