भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात आज एक थरारक घटना घडली असून जामनेर रोडवरील नाहाटा कॉलेज परिसरात एका रिक्षाल अचानक भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, आगीची तीव्रता एवढी मोठी होती की काही क्षणातच आगीच्या लोळांनी संपूर्ण रिक्षाला विळखा घातला. भररस्त्यात अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची मोठी पळापळ झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली होती. सुदैवाने, आग लागल्याचे लक्षात येताच रिक्षा चालक वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेत रिक्षाचे पूर्णपणे नुकसान झाले असून, हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




