Home क्राईम पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघड, मुद्देमाल...

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघड, मुद्देमाल जप्त


पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघडकीस आणत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला असून नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

१६ एप्रिल रोजी नय्युम जहांगिर देशमुख (रा. आक्सानगर, जारगाव, ता. पाचोरा) यांच्या इलेक्ट्रिक दुकानाच्या गोदामातून ९४ हजार ५०० रुपये किंमतीचे गोदरेज कंपनीचे तीन ए.सी. अज्ञात चोरट्यांनी चोरीस नेले होते. ही घटना १ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान घडली होती. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे रिहान हमीश शहा (वय २२, रा. हनुमाननगर, पाचोरा) याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले ९४ हजार ५०० रुपये किंमतीचे तीन ए.सी. जप्त करण्यात आले.

याचबरोबर १५ एप्रिल रोजी दाखल झालेल्या आणखी एका गुन्ह्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोतही पोलिसांनी हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा करून संपूर्ण मुद्देमाल अवघ्या तीन तासांत परत मिळवण्यात पोलिसांना यश आले.

या कारवाईत स. फौ. विलास पाटील, पो. हे. का. वसीम शेख, श्रीकांत गायकवाड, पो. कॉ. योगेश पाटील, संदीप राजपूत व गणेश कुंवर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे संबंधित फिर्यादींसह परिसरातील नागरिकांनी पाचोरा पोलिसांचे मनापासून कौतुक केले असून, गुन्हेगारांवर योग्य वेळी वचक बसल्याची भावना व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound