बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. काल जिल्ह्यात ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, बहुतांश तालुक्यांमध्ये पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे.
आजही तापमानात आणखी २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, उष्णतेच्या लाटेमुळे शेतमजूर, बांधकाम कामगार आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक फटका बसत आहे. आरोग्य विभागानेही उष्माघाताचा धोका लक्षात घेता सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी घेतला असून, यासंदर्भात डॉ. कालिदास थाणवी यांनी नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.



