Home उद्योग महावितरण खामगावमध्ये सखाराम थानवी यांची ‘दबंग’ एन्ट्री 

महावितरण खामगावमध्ये सखाराम थानवी यांची ‘दबंग’ एन्ट्री 

0
125


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महावितरणच्या खामगाव उपविभागात नव्याने रुजू झालेले कार्यकारी अभियंता सखाराम थानवी यांनी पदभार स्वीकारताच आपल्या कार्यशैलीची छाप पाडली आहे. कार्यालयीन शिस्त, ग्राहकाभिमुख सेवा आणि कामातील पारदर्शकतेवर भर देत त्यांनी सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतल्याने कर्मचारी आणि कंत्राटदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

कार्यकारी अभियंता सखाराम थानवी हे अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात असून, खामगाव महावितरण कार्यालयात रुजू झाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी आपल्या केबिनचे दरवाजे खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांनी थेट भेटीला प्राधान्य दिले आहे.

कार्यालयातील स्वच्छतेच्या मुद्द्यावरही त्यांनी तातडीने लक्ष केंद्रित केले. कार्यालय परिसरातील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी संबंधित साफसफाई कंत्राटदाराला जाब विचारला. यावेळी त्यांनी कामातील हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा संदेश दिल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रुजू होताच कार्यालयीन व्यवस्थेत सुधारणा करण्यास सुरुवात केल्याने महावितरणमधील कर्मचारी आणि संबंधित कंत्राटदारांमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

महावितरणच्या विविध निविदांबाबत माहिती देणारे सूचना फलक देखील अद्ययावत करण्यात आले आहेत. नागरिकांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. वीज ग्राहकांना तत्पर आणि दर्जेदार सेवा देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे कार्यकारी अभियंता सखाराम थानवी यांच्या कार्यपद्धतीतून स्पष्ट होत आहे. कार्यालयीन कामकाजातील शिस्त, स्वच्छता आणि नागरिकांशी थेट संवाद यावर त्यांनी दिलेला भर खामगाव परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.


Protected Content

Play sound