
वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव येथील हनुमान व्यायाम शाळेला भारत सरकार मान्यताप्राप्त स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) केंद्र तसेच खेलो इंडिया अंतर्गत कुस्ती प्रशिक्षण केंद्र मिळावे, यासाठी व्यायाम शाळा आणि शहरातील क्रीडाप्रेमी नागरिकांच्या वतीने केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

वरणगाव हे सुमारे ५० हजार लोकसंख्येचे शहर असून परिसरातील जवळपास २८ गावांतील युवक आणि क्रीडाप्रेमी हनुमान व्यायाम शाळेशी जोडलेले आहेत. या व्यायाम शाळेत दररोज सुमारे २०० हून अधिक व्यायामपटू आणि कुस्तीपटू सरावासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी शासनमान्य कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास परिसरातील खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे.
हनुमान व्यायाम शाळेतील कुस्तीपटूंनी आतापर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच ऑल इंडिया आयुध निर्माण फॅक्टरी चॅम्पियनशिपमध्ये येथील कुस्तीपटूंनी प्रथम क्रमांक पटकावून वरणगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे. या व्यायाम शाळेतील अनेक मल्ल आज संरक्षण विभाग, पोलीस खाते तसेच विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी खेलो इंडिया उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातून दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत यासाठी केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी भारत सरकार मान्यताप्राप्त SAI क्रीडा केंद्र उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात जिल्हा क्रीडा कार्यालयातही बैठक पार पडली आहे.
हनुमान व्यायाम शाळेचा इतिहास, उपलब्ध सुविधा आणि कुस्ती क्षेत्रातील योगदान लक्षात घेता येथे SAI केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दिनांक ९ जून रोजी केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी प्राध्यापक भागवत निकम, नरेंद्र माळी, इफ्तेखार मिर्झा, बाळासाहेब चव्हाण, संजय बाविस्कर यांच्यासह हनुमान व्यायाम शाळेचे पदाधिकारी आणि शहरातील क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते. वरणगाव परिसरातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी या केंद्राची मागणी करण्यात आली आहे.



