जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील गालापुर येथे अप्रमाणित पशुखाद्यामुळे ३५ गाई-म्हशींना झालेल्या अन्नबाधेच्या गंभीर घटनेत पशुसंवर्धन विभागाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. शासनाच्या ‘१९६२’ पशुवैद्यकीय आपत्कालीन हेल्पलाइनने तातडीने कार्यवाही करत पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पाठवले आणि वेळेत उपचार मिळाल्याने सर्व पशुधन सुरक्षित झाले आहे.
गालापुर येथील पशुपालक हमीर गबाजी गवळी यांच्या ३५ गाई-म्हशींनी बाजारातून विक्रीस आणलेले अप्रमाणित खाद्य खाल्ल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली. काही जनावरांची अवस्था गंभीर झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीत श्री. गवळी यांनी भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असलेल्या ‘१९६२’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला.

पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथील राज्यस्तरीय कॉल सेंटरमधून तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर घटनेची माहिती डॉ. यशवंत धावसे यांना देण्यात आली. त्यांनीही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या दीड तासाच्या आत फिरते पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. डॉ. यशवंत धावसे यांच्यासोबत पशुधन पर्यवेक्षक सुदर्शन पाटील आणि वाहनचालक भूषण कोळी यांनी आजारी पशुधनाची तपासणी केली. योग्य निदान करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले. वेळेत मिळालेल्या औषधोपचारामुळे ३५ गाई-म्हशींवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
तपासणीदरम्यान अप्रमाणित पशुखाद्य सेवन केल्यामुळे पशुधनाला विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बाधित जनावरांवर सोडियम बायकार्बोनेट, चारकोल, अट्रॉपीन सल्फेट, आर.एल., सी.पी.एम. आणि बी-कॉम्प्लेक्स यांसारख्या औषधांचा वापर करून उपचार करण्यात आले. सलग चार दिवस उपचार केल्यानंतर सर्व पशुधन धोक्याबाहेर आले आहे. या संपूर्ण उपचार प्रक्रियेत सहाय्यक आयुक्त डॉ. योगेश महाले आणि डॉ. पी. आर. पारखी यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. यशवंत धावसे यांनी सांगितले की, ‘१९६२’ कॉल सेंटरवरून संदेश मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी भेट देण्यात आली. वेळेत उपचार मिळाल्याने मोठी हानी टाळता आली.
पशुसंवर्धन विभागाची ‘१९६२’ ही आपत्कालीन सेवा राज्यातील पशुपालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. पशुधनाच्या आरोग्याचे संरक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी उपचार उपलब्ध करून देणे ही विभागाची प्राथमिकता असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील पशुपालकांनी पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ ‘१९६२’ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर पशुवैद्यकीय सेवा पोहोचविण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.



