Home आरोग्य “एका रक्तदानातून मिळते अनेकांना जीवनदान” – मुकुंद गोसावी

“एका रक्तदानातून मिळते अनेकांना जीवनदान” – मुकुंद गोसावी

0
14

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । १४ जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन शतकवीर रक्तदाता आणि रक्तदान जनजागृती कार्याचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी यांनी केले आहे. सध्या उन्हाळा, बदलते वातावरण आणि वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठ्याची कमतरता निर्माण झाली असून, गंभीर रुग्णांसाठी नियमित रक्तपुरवठा उपलब्ध राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

थॅलेसीमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, रक्तक्षय, अशक्त महिला, गर्भवती माता, प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिला, तसेच विविध शस्त्रक्रिया आणि अपघातातील गंभीर रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता असते. अशा रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे मुकुंद गोसावी यांनी म्हटले आहे.

“एक रक्तदान देईल अनेक गंभीर पीडितांना जीवनदान” हा संदेश देत त्यांनी नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे एका रक्तदानातून रक्ताचे विविध घटक तयार केले जातात. त्यामुळे एका व्यक्तीच्या रक्तदानातून अनेक गरजू रुग्णांना मदत मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली आणि ५० किलोपेक्षा अधिक वजन असलेली कोणतीही निरोगी व्यक्ती सहज रक्तदान करू शकते. रक्तदान केल्यानंतर कोणत्याही विशेष आहाराची गरज नसते. आपण नियमित घेत असलेला साधा आहार पुरेसा असतो. रक्तदानासाठी लागणारा वेळही कमी असतो आणि रक्तदानामुळे शरीरात कोणताही अशक्तपणा किंवा कमजोरी येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. रक्तदान केल्यानंतर शरीरात नवीन रक्ताची निर्मिती प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे रक्तदान हे आरोग्यासाठी सुरक्षित असून सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे प्रभावी माध्यम आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध आस्थापना आणि संवेदनशील नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, जेणेकरून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, पोलिओ आजारामुळे ७० टक्के शारीरिक व्यंग असूनही मुकुंद गोसावी यांनी आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून आतापर्यंत १०० पेक्षा अधिक वेळा रक्तदान केले आहे. रक्तदानामुळे आपल्याला कोणताही त्रास झाला नाही, उलट प्रत्येक वेळी नवीन ऊर्जा आणि समाधान मिळत असल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. मुक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान सेवा कार्यात सक्रिय असलेल्या मुकुंद गोसावी यांनी १४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान जनजागृती गीताची निर्मिती केली असून, या गीताचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. या माध्यमातून रक्तदानाबाबत समाजात अधिक जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


Protected Content

Play sound