पीएमसी बँक खातेदारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

raj thakarey

मुंबई प्रतिनिधी । सप्टेंबर महिन्यात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यामुळे खातेदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बँकेच्या खातेदारांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी खातेदारांनी आपल्या समस्या मांडल्या असून या समस्यांबाबत आवाज उठविण्याचा व निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात पीएमसी घोटाळ्यावर बोलण्याचे आश्वासन राज यांनी खातेदारांना दिले आहे.

पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर सध्या निर्बंध आहेत. त्यामुळं खातेदार हवालदील झाले आहेत. कुणाला आपल्या मुलाबाळांची लग्नकार्यं पुढे ढकलावी लागली आहेत. तर, कुणाला दागिने गहाण ठेवून जगण्याची वेळ आली आहे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत हा मुद्दा लावून धरला आहे. प्रत्येक सभेत पीएमसी बँकेच्या घोटाळ्यावरून राज ठाकरे सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरत आहेत. पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर भाजपचेच नेते आहेत हे राज जाहीरपणे सांगत आहेत. मनसेच्या या भूमिकेमुळे अपेक्षा उंचावलेल्या खातेदारांनी आज त्यांची भेट घेतली. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे व मनसेचे नेते बाळा नांदगावकर यावेळी उपस्थित होते. राज यांनी शांतपणे खातेदारांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच, त्यांना या प्रश्नी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. खातेदारांच्या भेटीनंतर शर्मिला ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. ‘पीएमसीच्या खातेदारांच्या समस्यांकडे सरकार का लक्ष देत नाही? सिटी बँकेतही असेच गैरप्रकार सुरू आहेत. मात्र, त्याबद्दल कोणी बोलतही नाही. सिटी बँकेच्या संचालक मंडळावर शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ आहेत. त्यांच्यावर खटला का दाखल केला जात नाही,’ असा प्रश्न शर्मिला यांनी सरकारला केला. ‘पीएमसी घोटाळ्यावर मी प्रत्येक भाषणात बोलतोच आहे. यापुढंही बोलत राहीन आणि निवडणुकीनंतर या प्रश्नी पाठपुरावा करेन,’ असा शब्द राज यांनी खातेदारांना दिल्याचे शर्मिला यांनी यावेळी सांगितले.

Protected Content