नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान मोदी यांनी आपल्या विरोधकांचे आवाज देखील ऐकायला हवे असा सल्ला माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांनी दिला आहे. आपल्या शेवटच्या पुस्तकातून त्यांनी समकालीन राजकारणावर भाष्य केले आहे.
दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे प्रेसिडेन्शयल इयर्स २०१२-१७ या पुस्तकाचे काल प्रकाशन करण्यात आले. यात त्यांनी अनेकविध राजकीय भाष्य केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ‘पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या पूर्वसुरींकडून प्रेरणा घ्यायला हवी. पहिल्या टर्ममध्ये मोदी सरकारला अनेकदा संसदीय संकटांचा सामना करावा लागला. अशी संकटं टाळण्यासाठी मोदींनी संसदेच्या कामकाजावेळी उपस्थित राहायला हवं,’ असा सल्ला मुखर्जींनी दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी असंतुष्टांचे आवाज ऐकायला हवेत. संसदेत जास्त वेळा बोलायला हवं. विरोधकांना समजावण्यासाठी आणि देशाशी संवाद साधण्यासाठी, नागरिकांना महत्त्वाच्या विषयांची माहिती देण्यासाठी त्यांनी संसदेचा वापर एक व्यासपीठ म्हणून करायला हवा, असं मत मुखर्जी यांनी पुस्तकात नमूद केला आहे.