फोन टॅपिंग अहवालातून अनेकांचे बिंग फुटणार — फडणवीस

 

 

 

नागपूर: वृत्तसंस्था ।  पोलीस दलातील बदल्यांबाबतचा फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे बिंग फुटणार असल्यानेच राज्यातील नेते अस्वस्थ आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

. महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी करण्याचं काम कुणी केलं? वाझे सारख्या निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेऊन त्याच्याकडे महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या. वाझे सारख्यांना सेवेत घेऊन सिंडिकेट राज चालवण्यात आलं. त्यामुळे पोलीस बदनाम झाले की पोलिसांचं नाव झालं ते सांगा? असा सवाल त्यांनी केला.

 

एनआयएच्या चौकशीमुळे आघाडीतील लोक अस्वस्थ आहेत. नवाब मलिक आणि त्यांचे सहकारी घाबरले आहेत. वाझे काय बोलणार याची त्यांना भीती वाटत आहे. वाझेंचे बोलविते धनी चिंतेत आहेत, असंही ते म्हणाले. मी केवळ फोन टॅपिंग प्रकरणाचे दोन पाने दिली होती. मलिक यांनी अख्खा अहवाल देऊन अहवाल फोडला, असा दावाही त्यांनी केला.

 

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावेळी फडणवीसांनी सावंतांची अक्षरश: खिल्ली उडवली. सचिन सावंतांना मी काय उत्तर द्यायचं. त्यांना काही  समजतं तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. असं रोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार? असा टोलाही त्यांनी लगावला.

 

पोलिसांच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर कुणीही गायब केली तरी त्याचा बॅकअप मेन सर्व्हरला आहे. प्रायव्हेट डीव्हीआर नष्ट करणं सोपं आहे. पण पोलिसांचा डीव्हीआर गायब करणं सोपं नाही. त्यामुळे त्याचे पुरावे मिटणार नाहीत. तशी व्यवस्थाच करून ठेवली आहे, असंही ते म्हणाले.

 

देशातील कोरोनाची स्थिती आणि महाराष्ट्राची स्थिती यातील अंतर इतके का आहे, याचा विचार महाराष्ट्र सरकारला करावा लागेल. जितक्या लस केंद्राने दिल्या, त्या अजूनही वापरलेल्या नाहीत. त्यामुळे उगाच केंद्रावर टीका करण्याऐवजी प्रत्यक्ष कोरोना नियंत्रणाचे उपाय राबविले पाहिजे. नागपुरातील स्थिती दिवसांगणिक भयावह होते आहे. प्रशासनाने पूर्णपणे अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये जाऊन लोकांना दिलासा द्यावा आणि प्रत्यक्ष मदतही करावी, असे ते म्हणाले.

Protected Content