मुख्यमंत्री व हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीत संबंध काय ? : किरीट सोमय्या

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यात संबंध काय ? असा सवाल करत माजी खासदार तथा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर तोफ डागली आहे.

 

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली. यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर आज पुन्हा त्यांनी पत्रकारांशी बोलतांना ठाकरे कुटुंबाला टार्गेट केले आहे.

या संदर्भात सोमय्या म्हणाले की, श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यासंदर्भात मी गेल्या दीड वर्षांपासून ईडीला पाठपुरावा करत आहे. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारामुळे त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता आहे. ईडीने एका व्यवहाराची माहिती दिली असून ३० कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांचे संबंध काय? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली.

ठाकरे साहेबांनी त्यांचे आणि परिवाराचे आर्थिक व्यवहार, व्यवसायिक संबंध सांगितले तर किरीट सोमय्या, ईडी किंवा न्यायालयाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. मुख्यमंत्री परिवाराला माझी विनंती आहे की जे आर्थिक व्यवहार आहेत, शेल कंपन्यांकडून पैसे घेतले, मनी लॉंड्रिंग केलं त्यासंबंधी तुम्ही माहिती देणार की मलाच द्यावी लागणार. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी २०१४ मध्ये कोमास प्रॉपर्टीज कंपनी जी बनवली होती. यामध्ये आदित्य ठाकरे मालक पण, संचालक पण, ५० टक्के त्यांचे आणि ५० टक्के रश्मी ठाकरेंचेया कंपनीची आता नंदकिशोर चतुर्वैदीच्या मालकीची आहे. हा हवाला ऑपरेटर असून ३० कोटींच्या व्यवहारात त्यांचा समावेश आहे. ठाकरे परिवाराने जी कंपनी बनवली होती ती नंदकिशोर चतुर्वेदींना का दिली?, अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.

जसा अन्वय नाईकचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर माफिया सेनेचे १२ नेते अंगावर आले होते. तीन वेळा हल्ला केला होता आता कुठे आहेत? कारण नंदकिशोर हा हवाला ऑपरेटर आहे. त्यांची कंपनी ठाकरे कुटुंबाने तयार केली आहे. ती कंपनी कधी, कशी आणि का दिली? नंदकिशोर चतुर्वैदी आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध काय? ठाकरे परिवाराचा हा पहिलाच मनी लॉंड्रिंग व्यवहार आहे का? यासंबंधी महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे, असं सोमय्या म्हणाले.

Protected Content