



यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कुंभार समाजाच्या प्रगतीसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा गौरव करणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर यावल येथील पद्मावती सभागृहात कुंभार समाजाच्या वतीने विभागीय गुणवंत विद्यार्थी गुणगौरव तसेच उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे आणि यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
हा सोहळा कुंभार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि समाजातील विविध मान्यवरांच्या हजेरीत पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुंभार समाजाच्या विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर समाजात निरपेक्ष भावनेने सातत्याने सेवा देणाऱ्या विविध समाजसेवकांना ‘उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे आणि नगराध्यक्ष छाया पाटील यांनी यावल शहराच्या व समाजाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन भावूक वातावरणात नागरी सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी कुंभार समाजाच्या या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत, युवा पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले.
या सोहळ्यास भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील , शरद जिवराम महाजन,कुंभार समाज सामाजीक संस्था.महाराष्ट्र चे अध्यक्ष उमाकांत क्षिरसागर, यावल नगरपालिका भाजपाच्या गटनेत्या नंदाताई महाजन यांच्या अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते .



