Home धर्म-समाज भुसावळात पर्जन्यवृष्टीसाठी मुस्लिम बांधवांची विशेष नमाज

भुसावळात पर्जन्यवृष्टीसाठी मुस्लिम बांधवांची विशेष नमाज

0
8


भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील अनेक भागांसह जळगाव जिल्ह्यातही पावसाने दडी मारल्याने बळीराजा संकटात सापडला असून सर्वत्र पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि राज्यात समृद्ध पर्जन्यवृष्टी व्हावी या उद्देशाने भुसावळातील मुस्लिम बांधवांच्या वतीने रविवारी (दि. ३०) सकाळी विशेष नमाज अदा करून अल्लाहच्या दरबारात सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

अपुऱ्या पावसामुळे शेतीची कामे ठप्प पडली असून विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील खडकरोड परिसरातील ऐतिहासिक बडी इदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता दोन रकात नाफील नमाजचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक प्रार्थनेत शहरातील शेकडो मुस्लिम बांधव अत्यंत भक्तीभावाने सहभागी झाले होते. सर्वांनी एकाच वेळी हात उंचावून दुष्काळाचे संकट टळावे, भुसावळ शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि देशात समाधानकारक पाऊस पडून शेतकरी वर्ग सुखी व्हावा, अशी आर्त हाक अल्लाहला मारली.

इस्लामिक परंपरेनुसार जेव्हा दीर्घकाळ पाऊस पडत नाही किंवा कोरड्या दुष्काळाची भिती निर्माण होते, तेव्हा मोकळ्या मैदानात एकत्र येऊन विशेष नमाज अदा केली जाते, ज्याला ‘नमाज-ए-इस्तिस्का’ असे म्हणतात. या धार्मिक परंपरेचे पालन करत भुसावळातील नागरिकांनी निसर्गाची अवकृपा दूर होऊन बळीराजाला दिलासा मिळावा यासाठी सामूहिक दुआ मागितली. भर उन्हात पार पडलेल्या या विशेष प्रार्थनेची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून लवकरच वरुणराजा बरसून सर्वांना संकटातून मुक्त करेल, अशी आशा उपस्थितांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound