


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रसिद्ध श्री गर्जना मित्र मंडळ, नवीपेठ यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सव २०२६ चे भव्य आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक आणि प्रसिद्ध देवस्थानांची हुबेहूब आरास साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळाने यंदा कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कराडी येथील प्राचीन व रहस्यमय केशवनाथेश्वर मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे.
श्री गर्जना मित्र मंडळ नवीपेठ दरवर्षी भाविकांना वेगवेगळ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवत असते. यापूर्वी मंडळाच्या वतीने वैष्णोदेवी, पशुपतीनाथ आणि द्वारका यांसारख्या भव्य देवस्थानांची मनमोहक आरास यशस्वीरीत्या साकारण्यात आली आहे. याच परंपरेला पुढे नेण्यासाठी यंदा सलग १० व्या वर्षी जयपूर येथून विशेष बनवून आणलेल्या संगमरवरी (मार्बल) पर्यावरणपूरक बाप्पाच्या सुबक मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. गेल्या ९ वर्षांपासून या विशेष मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा मंडळाने जतन केली आहे.
यंदा साकारण्यात येणारे केशवनाथेश्वर मंदिर हे प्राचीन शैव परंपरेचा एक महत्त्वाचा वारसा मानले जाते. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील गुहा वर्षभर पूर्णपणे पाण्याने व्यापलेली असते. या गुहेत एक नैसर्गिकरीत्या प्रकट झालेले स्वयंभू शिवलिंग आहे, ज्याची निर्मिती मानवाने केलेली नाही. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना गुडघे किंवा कंबरेएवढ्या पाण्यातून चालत जावे लागते. जळगावातील भाविकांना देखील या देखाव्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात केशवनाथेश्वर मंदिरात फिरण्याचा आणि पाण्यातून चालून दर्शन घेण्याचा थक्क करणारा अनुभव मिळत आहे. गणेशोत्सव २०२६ सुरळीत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी रिकू उमाकांत चौधरी, उपाध्यक्षपदी योगेश अशोक सोनवणे, सचिवपदी सागर पाटील, खजिनदारपदी सागर व्यास आणि सल्लागारपदी कुणाल मेतकर यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून मुकेश पाटील, शैलेश अभंगे, ॲड. अविनाश महिरे, अमोल जैन, महेश कापसे, दीपक सोनवणे आणि चेतन मालुसरे व हितेश रवींद्र जावळे हे जबाबदारी सांभाळणार आहेत.



