


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, जातीय सलोखा आणि जनजागृतीचा संदेश देणाऱ्या कळमसरे येथील राम-रहीम मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात नशामुक्तीचा अनोखा उपक्रम राबविला. मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्वतः कोणत्याही प्रकारच्या नशेचे सेवन न करण्याची तसेच इतरांनाही व्यसनापासून परावृत्त करण्याची शपथ घेतली. ‘नशामुक्त तरुणाई—सुदृढ समाज’ असा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
समाजातील तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि व्यसनाधीन व्यक्तींना नशेपासून बाहेर पडण्यासाठी सहकार्य करावे, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी सागर कोळी यांनी उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांना नशामुक्तीची शपथ दिली. शपथ घेताना कार्यकर्त्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच आपल्या परिसरातील नागरिकांमध्येही व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. व्ही. आर. पाटील, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा सात्रीचे माजी सरपंच महेंद्र बोरसे, माजी उपसरपंच पिंटू राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शत्रुघ्न पाटील, महेमूद खान, दिलीप गुजर, भागवत कोळी, नईम खान, वसीम पठाण, मोतीलाल महाजन, धर्मेंद्र राजपूत यांच्यासह राम-रहीम मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक प्रश्नांवर जनजागृती व्हावी, या उद्देशाने राम-रहीम मित्र मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी दिसून आले. नशेच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणांच्या आरोग्यावर तसेच कुटुंब आणि समाजजीवनावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधत कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्त समाज उभारणीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलताना ॲड. व्ही. आर. पाटील यांनी कळमसरे गावातील सामाजिक एकोप्याचे कौतुक केले. “कळमसरे गाव हे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सामाजिक एकोपा जोपासणारे गाव म्हणून परिचित आहे. पुन्हा एकदा येथील तरुणांनी गणपती उत्सवाच्या माध्यमातून अनोखा संदेश दिला असून, हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जोपासणारा आहे,” असे त्यांनी सांगितले.
महेंद्र बोरसे यांनीही मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. “कळमसरे येथील तरुणांचा आदर्श नक्कीच घ्यावा, असा गणेशोत्सव साजरा होत आहे. प्रत्येक सण, उत्सव जातीयतेत विभागले जात असताना येथील मुस्लिम बांधवांनी जपलेला जातीय सलोखा आणि सामाजिक एकोपा कौतुकास्पद आहे. या स्तुत्य उपक्रमाला माझा मनापासून सलाम,” असे त्यांनी नमूद केले. राम-रहीम मित्र मंडळाच्या नावाप्रमाणेच सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमाला यंदा नशामुक्तीची जोड मिळाली आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याच्या या प्रयत्नातून तरुणांनी स्वतःपासून सुरुवात करून इतरांनाही व्यसनांपासून दूर ठेवण्याचा संदेश दिला.



