Home Cities जळगाव जळगावच्या प्रल्हाद सोनवणेंसह ११ रिक्षाचालकांचा सोलापुरात ‘राज्यस्तरीय चालकरत्न’ पुरस्काराने गौरव

जळगावच्या प्रल्हाद सोनवणेंसह ११ रिक्षाचालकांचा सोलापुरात ‘राज्यस्तरीय चालकरत्न’ पुरस्काराने गौरव

0
2


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने चालक दिनानिमित्त सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘चालक रत्न पुरस्कार सोहळ्यात’ जळगाव जिल्ह्यातील सामाजिक आणि व्यावसायिक योगदान देणाऱ्या ११ ऑटो रिक्षाचालकांचा राज्यस्तरीय ‘चालकरत्न’ पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात जळगावचे ज्येष्ठ रिक्षाचालक नेते प्रल्हाद सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील इतर १० चालकांना त्यांच्या उल्लेखनीय व प्रामाणिक सेवेबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सोलापूर येथे उत्साहात पार पडलेल्या या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात राज्यातील तब्बल २७ जिल्ह्यांमधून निवड झालेल्या १२७ गुणवंत ऑटो रिक्षाचालकांना ‘चालकरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. जळगावचे प्रल्हाद सोनवणे यांनी गेल्या ३० वर्षांपासून ऑटो रिक्षा चालक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्षतेने आणि उत्कृष्ट सेवा दिली आहे. केवळ सेवाच नाही तर रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन, जळगाव जिल्हा’ ची स्थापना केली. या युनियनच्या माध्यमातून जळगाव जिल्हा आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील ऑटो रिक्षाचालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते अविरत कार्य करत आहेत. त्यांच्या या सामाजिक भान आणि धडपडीची दखल घेत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज भाई सय्यद व प्रदेश उपाध्यक्ष इरफान शेख यांच्या पुढाकाराने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात प्रल्हाद सोनवणे यांच्यासोबतच जळगाव जिल्ह्यातील इतर १० कर्तृत्ववान रिक्षाचालकांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये तन्वीर शफीउल्ला, नरेंद्र ताराचंद पाटील, शेख नबी शेख करीम कुरेशी, मुश्ताक शाह पीरन शाह, तौसिफ अहमद अल्ताफ शेख, शाम सूर्यवंशी, मुश्ताक शेख मुख्तार, प्रमोद सपकाळे, संजय एकनाथ शिंदे आणि कैलास रामचंद्र साळुंखे यांचा समावेश आहे. या सर्व चालकांनी आपापल्या क्षेत्रात आणि व्यवसायात दाखवलेल्या निष्ठेबद्दल उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.

पुरस्कार वितरण सोहळ्यास सोलापूरचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी, मोटार वाहन निरीक्षक गिरी, मोटार वाहन निरीक्षक झगडे, विरोधी पक्षनेत्या वहिदा आपा, नगरसेवक जुबेर भगवान, शिवसेनेचे कार्याध्यक्ष सलाऊद्दीन, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आबा साहेब लंगोटी, टायगर संघटना नांदेडचे संस्थापक अध्यक्ष अहमद भंगारवाला, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे उपाध्यक्ष इरफान शेख आणि आझाद रिक्षा संघटना पुणेचे संस्थापक अध्यक्ष शफीक भाई पटेल आदी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सैय्यद यांनी राज्यातील ऑटो रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित समस्यांवर प्रकाश टाकला. चालकांच्या न्याय्य हक्कांसाठी, सुरक्षेसाठी आणि त्यांच्या परिवाराच्या हितासाठी संघटना शासन व प्रशासकीय दरबारी सातत्याने, प्रामाणिकपणे लढा देईल, असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.


Protected Content

Play sound