Home क्राईम फैजपूरजवळ वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त ; १ लाख ५६ हजारांच्या...

फैजपूरजवळ वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त ; १ लाख ५६ हजारांच्या मुद्देमालासह चालकावर गुन्हा दाखल

0
3


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरुड फाट्याजवळ पोलिसांनी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि ६ हजार रुपयांची १ ब्रास वाळू असा एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर पोलीस ठाण्याचे अंमलदार रूपेश दिगंबर पाटील हे सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना पिंपरुड फाट्यावरील किशोर गुजराती यांच्या ट्रेडिंग कंपनीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. एक विना नंबरचा स्वराज कंपनीचा (७४४ FE मॉडेल) लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेली निळ्या रंगाची विना नंबरची ट्रॉली संशयास्पदरित्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सदर वाहन थांबवून पाहणी केली असता त्यात अवैधरीत्या उत्खनन केलेली वाळू आढळून आली.

या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक व मालक पंढरीनाथ हरी सपकाळे (वय ४३, रा. विरोदा, ता. यावल, जि. जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना तसेच वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आढळून आला नाही. पोलिसांना चकवा देऊन विनापरवाना चोरटी वाळू वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रूपेश पाटील यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात आरोपी पंढरीनाथ सपकाळे याच्याविरुद्ध  गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाईची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर यांना देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound