


चोपडा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद येथील एका ३६ वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने सततची नापिकी आणि पावसाच्या अभावामुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विजय ऊर्फ बंटी प्रताप माळी (वय ३६, रा. वरचा माळी वाडा, अडावद) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे अडावद परिसर तसेच संपूर्ण चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजय माळी हे आपल्या मालकीची चार बिघे शेती कसत होते. गेल्या वर्षी त्यांनी शेतात मूग, उडीद आणि कांद्याचे पीक घेतले होते. मात्र, ऐन काढणीच्या वेळी कांद्याला अत्यंत कमी भाव मिळाल्यामुळे त्यांना लागवडीचा झालेला खर्चही वसूल करता आला नव्हता. या आर्थिक संकटातून सावरून त्यांनी यंदा मोठ्या आशेने हातउसवारी करून तसेच क्रेडिट कार्डवर कर्ज काढून शेतात मका पिकाची लागवड केली होती. मात्र, पावसाने मारलेल्या ओढीमुळे आणि अवर्षणासदृश परिस्थितीमुळे मक्याचे पीक पूर्णपणे करपून गेले. मका निघाल्यानंतर कांदा लागवडीसाठी टाकलेले बियाणे व रोपसुद्धा पावसाअभावी नष्ट झाले.
सततच्या नापिकीमुळे डोक्यावर साचलेले कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेत विजय माळी गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चिंतेत होते. याच नैराश्येतून १८ सप्टेंबर रोजी दुपारी त्यांनी शेतात जाऊन ठिबकच्या नळ्यांचा वापर करत झाडाला गळफास लावून घेतला. ही बाब निदर्शनास येताच त्यांना तातडीने उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
१९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अडावद येथे विजय माळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा मोठा परिवार आहे. ऐन तरुण वयात कुटुंबाचा कर्ता पुरुष निघून गेल्याने माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेतमालाला मिळणारा कमी भाव, पावसाची अस्मानी सुलतानी आणि बँकांसह हातउसवारीच्या कर्जाचा वाढता डोंगर या दुष्टचक्रात सापडून अडावद येथील तरुण शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याने शेतकरी वर्गातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.



