पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी | चोरगावसह परिसरातील शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणार्या बिबट्याला अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजर्याच्या मदतीने जेरबंद करण्यात आले आहे.
चोरगावसह परिसरातील गावांच्या शिवारात बिबट्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली होती. २७ जानेवारी रोजी बिबट्याने दोन वासरे फस्त केली होती. यानंतर काही दिवसांपूर्वीच चोरगाव येथे मंगल विठ्ठल सोनवणे यांच्या गोठयातील वासराचा फडशा बिबट्याने पडला होता. यामुळे शेतकरी भयभीत होते. वनाधिकार्यांनी पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी करत जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार १५ रोजी पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी मध्यरात्री हा बिबट्या आव्हाणी येथील नंदू पाटील यांच्या शेतात लावलेल्या पिंजर्यात अडकला.
दरम्यान, बुधवारी सकाळी अधिकार्यांनी आव्हाणी येथे जाऊन पिंजर्यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहायक वनसंरक्षक एस.के.शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे, मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई यांनी मदत केल्याने बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
या संदर्भात बोलतांना जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की, चोरगाव, देवगाव, फुपणी, नंदगाव, नारणे, आव्हाणी, दोनगाव परिसरातील बिबट्याचा वावरामुळे धोका वाढला होता. पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाल्याने दिलासा मिळाला आहे. आमुळे आपण वनविभागासह वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांचे आभार मानतो.